profile image
by ashishsamant87
on 22/4/17

HELP - FREQUENT BURGLARIES

*आगाशी पाठोपाठ अर्नाळा गावात दरोडेखोरांचे आगमन...सुदैवाने मनुष्यहानी नाही...*
 
दोनच आठवड्यांपूर्वी आगाशी क्रॉसनाका येथील एकाच रात्री तीन घरफ़ोड्यांची घटना ताजी असतानाच अर्नाळा गावात भर वस्तीत घरफ़ोड्यांची आणखी तीन प्रकरणे उजेडात आली आहेत. आगाशीतील घटनांचा अजूनही शोध सुरु असून दरोडेखोरांचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नाही. पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा घडलेल्या घटनामुळे अर्नाळा गावात प्रचंड भितीचं वातावरण पसरलं असून पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता श्री राम मंदिराजवळ राहणारे अश्विन अर्नाळकर यांचे घराचा मागील दरवाजा फ़ोडून चोरट्यांनी प्रवेश केला मात्र घरात काहिही न सापडल्यामुळे चोरांना हात हलवत पोबारा करावा लागला. याबाबत पोलिसांनी सतर्कता दाखवली नाही व त्वरित एफ़आयआर दाखल न केल्यामुळे अर्नाळा ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत चीड व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या ह्या अक्षम्य दुर्लक्षितपणाचा मोठा फ़टका अर्नाळा सी बीच रिसोर्टचे मालक संदिप व मंदार ह्या सामंत बंधुंना भोगावा लागला. दि. १९ एप्रिलच्या मध्यरात्री २.३० वाजता दरोडेखोरांनी त्यांच्या साफ़ल्य बंगल्याचा मागील दरवाजा फ़ोडुन सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लुटुन नेला. संदिप सामंत यांची नवी ब्रेझा गाडी पळविण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. जाताना बाजूच्याच नांदेवाडीतील वैभव घरत यांची मोटर सायकल ( क्र. एमएच०४ - डीव्ही ४५४४) चोरुन नेली. दरोडेखोरांनी असाच एक धाडसी प्रयत्न श्री राम नवमीच्या आधी दोन चार दिवसांपूर्वी बॅंक ऑफ़ महाराष्ट्र शाखेच्या बाजूच्या बंद घरात केला होता मात्र हाती काहिच न लागल्यामुळे सदर घटनेचा बोलबाला झाला नाही असे ग्रामस्थांनी सांगीतले.

*वसई तालुक्यात झपाट्याने फ़ोफ़ावलेल्या अवैध वसाहती, परप्रांतियांची व बांगलादेशींची घूसखोरी, त्यामुळे सतत वाढत चाललेली लोकसंख्या, तुलनेत अपूर्ण पोलिस बळ आणि लोकप्रतिनिधींंचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे गेल्या दहा वर्षांत वसई तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. पोलिस ठाणी जरी वाढवण्यात आली असली तरी कोणत्याही प्रकारची सुसज्जता, सुसुत्रता, सुविधा व सामुग्री नसल्यामुळे अत्यंत कमी संख्या असलेल्या पोलिस दलाला चोवीस तास ड्युटी करावी लागत आहे. पोलिसांवर पडणारा हा विलक्षण मानसिक व शारिरीक ताण तणाव तालुक्यातील गुन्हेगारी झपाट्याने वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. सामाजिक सुरक्षेची आपली प्रमुख जबाबदारी असल्याचा आमच्या लोकप्रतिनिधींना विसर पडल्यामुळे वसई तालुक्यात आज जनजीवन असुरक्षित झाले आहे.*